Wednesday, 1 August 2018

अण्णाभाऊ साठे यांची जयंती

अण्णाभाऊ साठे यांची जयंती

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे.

तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या  मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.

No comments:

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

  Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Frien...