माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान
असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना एक अभिमान देणार्या कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करायचे घोषित केले. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला आणि हा दिवस आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.
तेव्हा समस्त मराठी जनांना 'जागतिक मराठी भाषा दिवसाच्या' हार्दिक शुभेच्छा
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होऊ लागला त्याला आता बरीच वष्रे झाली. वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून आपण जगाला हे सांगत असतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे. इत:पर हिचे पांग आम्ही फेडू शकत नाही. एक जिवंत भाषा म्हणून तिच्या संवर्धनाचा, आधुनिकीकरणाचा वसा आम्ही टाकून दिला आहे. भाषा दिन साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील गोष्टी आहेत. इंग्रजी भाषेप्रमाणे सर्व प्रकारचे व्यवहार मराठीतून करणे, त्यासाठी मराठी माध्यमातूनच शिकणे-शिकवणे हे आम्हाला जमणार नाही. आम्हाला स्वत:ची प्रगती करायची आहे; स्वभाषेची नव्हे. अख्ख्या जगाने समृद्ध केलेली इंग्रजी हीच आमच्यासाठी ज्ञानभाषा व उद्याची लोकभाषा आहे.’ अर्थात, हे आपण बोलून दाखवत नाही. कारण तसे करणे औचित्याला धरून नाही. किंवा पोपट मेला हे सांगण्याचे धर्य आपणापाशी नाही. त्यापेक्षा एखादा दिवस मराठीच्या (न करायच्या) विकासासाठी एकमेकांना शुभेच्छा देणे हे आपल्या उत्सवप्रियतेला व दांभिकपणाला शोभणारे आहे.
मराठीसंबंधी असे कटू पण स्पष्ट बोलणे अनेकांना आवडणार नाही. पण ते काम कोणीतरी केलेच पाहिजे. अन्यथा, इतिहास आपल्याला माफ करणार नाही. मराठीबाबतचे भ्रम जोपासत आपण येणाऱ्या पिढय़ांचे आणि विशेषत: तळागाळातील समाजाचे अपरिमित नुकसान करीत आहोत. यापुढे ज्यांना मराठीतून आपली आपली उपजीविका साधायची आहे त्यांना मराठीचे येत्या ३०-४० वर्षांतले चित्र काय असणार हे स्पष्टपणे सांगायला हवे. स्वभाषेच्या वापराचा अलिखित करार आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी कधीच मोडला आहे. यापुढे जे लोक त्याचे पालन करतील त्यांना पश्चात्ताप करावा लागेल. रांगेचा फायदा सर्वाना होतो. पण कधी? सर्वानी रांगेत उभे राहण्याच्या नियमाचे पालन केले तर. भाषेचेही तसेच आहे. भाषेचा विकास ही सर्वानी मिळून सातत्याने करायची गोष्ट आहे. चार-दोन लोकांनी, कधीतरी करायची गोष्ट नाही.
आता आपण हे जाहीरपणे स्वीकारायला हवे की मराठी ही कधीच ज्ञानभाषा होऊ शकणार नाही. जी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून टिकू शकत नाही ती ज्ञानभाषा कशी होणार? आणि जी भाषा ज्ञानभाषा नाही ती भाषा जागतिकीकरणाच्या- भाषिक ध्रुवीकरणाच्या काळात सुरक्षित तरी कशी राहणार? सर्व प्रकारच्या शिक्षणाचे माध्यम असणे म्हणजे भाषेची मुळे जिवंत, सशक्त असणे होय. पण ती मेली की भाषेचा वृक्ष मग तो कितीही पुरातन असो, तो उन्मळून पडणारच. शेकडो वर्षांची परंपरा असलेली भाषा मरायला अनेक दशके, शतके लागतात. पण हे लक्षात न घेतल्यामुळे आपली भाषा मृत्युपंथाला लागलेली असतानाही निजभाषकांचा तीवर विश्वास बसत नाही. मराठीच्या अस्तित्वाबाबतही मराठी समाजामध्ये भ्रममूलक वातावरण आहे. ते दूर करून नवीन पिढीला सत्य सांगितले पाहिजे आणि मराठीबाबत वास्तववादी व निर्णायक भूमिका घेतली पाहिजे. आता हा प्रश्न भावनिक पातळीवर हाताळण्यात अर्थ आहे असे वाटत नाही.
मराठीचा प्रश्न हा भावनात्मक, सांस्कृतिक प्रश्न आहे आणि तो मराठी भाषेविषयी उत्सवी जनजागरण करून सोडवता येईल ही एक अंधश्रद्धा होती हे एव्हाना सिद्ध झाले आहे. भाषेचा प्रश्न हा मूलत: आíथक प्रश्न आहे. प्रत्येक समाजाला स्वभाषेविषयी प्रेम असते. पण ते प्रेम ती भाषा जगण्याला उपयोगी पडते व भौतिक प्रगतीच्या आड येत नाही तोवरच कार्यरत असते. आपण आपली भाषा सोडतो ती अन्य भाषेविषयी प्रेम वाटते म्हणून नव्हे तर आपली भाषा आपणास आíथक संधी पुरवण्यात कमी पडते म्हणून. इंग्रजीविषयी आपल्या समाजात प्रेमाऐवजी वासाहतिक द्वेषाची भावना होती तरीही आपण तिला शरण गेलो. कारण आपले पहिले प्रेम तिच्या वापरामुळे मिळणाऱ्या पशावर व त्यातून मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेवर आहे. उद्या आíथक संधी पुरवण्याच्या बाबतीत इंग्रजीची जागा दुसऱ्या एखाद्या भाषेने घेतल्यास आपण तिचा स्वीकार करू. इंग्रजीतर भाषेचे वर्चस्व असलेल्या देशांत जाऊन आपण तेथील भाषा निमूटपणे शिकायला तयार होतो. कारण आपल्याला आपल्या भौतिक प्रगतीशी देणेघेणे असते. अशा स्थितीत जिच्याविषयी आपणास आंतरिक प्रेम असते त्या आपल्या निजभाषेला आपण ‘स्लीप मोड’वर ठेवून परकीय पण प्रगतीच्या भाषेला आपण ‘अॅक्टिव्ह मोड’वर आणतो. स्वभाषेविषयीचे आपले प्रेम मरत नाही ते फक्त भावनिक, प्रतीकात्मक पातळीवर राहते.
हे सर्व अटळ आहे का? अजिबात नाही. आपण आपली भाषा आíथक संधींची, सामाजिक प्रतिष्ठेची करू शकत नाही का? अवश्य करू शकतो. पण त्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे सर्वाचेच हात लागले पाहिजेत, जे आता शक्य दिसत नाही.
मराठी भाषेला काहीही झालेले नाही आणि भविष्यात काही होणार नाही असा एक भ्रम मराठी भाषा दिनाला हमखास पसरवला जातो, तो अधिक धोकादायक आहे. हे खरे आहे की, मराठी भाषेचे जे काही झाले आहे त्याला मराठी भाषा जबाबदार नाही तर मराठी भाषक जबाबदार आहेत. भाषा मरत नाहीत; भाषक मरतात. गेल्या दोन-तीन दशकांत हजारो-लाखो मराठी ‘भाषक’ मेले, म्हणजे त्यांनी मराठीचा त्याग केला. आपल्यापकी अनेकांना महत्त्वाच्या व्यवहार क्षेत्रांत मराठी भाषा वापरण्याची लाज वाटते. अपराधीपणाचे वाटते. आपण मराठीचा जयजयकार करीत आपल्या नंतरच्या पिढय़ांना मराठीपासून प्रयत्नपूर्वक तोडले. जणू हे पाप लपवण्यासाठीच मराठीला काही झालेले नाही, हे एकमेकांना सांगत राहिलो.
मराठी ही मृत्युपंथाला लागलेली भाषा आहे हे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी पाऊणशे वर्षांपूर्वी सांगितले होते. १९६० नंतर म्हणजे मराठी भाषेचे राज्य स्थापन झाल्यानंतर ती स्थिती बदलण्याची आपल्याला संधी होती; पण मराठी भाषेला काही झालेले नाही या भ्रमात राहणे आपण पसंत केले. हा भ्रम मराठी साहित्यिकांनी विविध वाङ्मयीन व्यासपीठांवरून सर्वदूर पसरवला. सासवड मुक्कामी नुकत्याच पार पडलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. िशदे एका मुलाखतीत काय म्हणाले पाहा- ‘जोवर कीर्तनं रंगतायेत, भजनं घुमतायेत, वारकरी आहेत तोवर तरी मराठीची काळजी करावी असं मला अजिबात वाटत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचाही उगाच बाऊ करण्यात अर्थ नाही. आजच्या काळात इंग्रजीची उत्तम जाण हवीच. आणि शाळा इंग्रजी असली तरी घरी मराठीचे संस्कार करता येतातच की. त्यात काय अडचण आहे? त्यामुळे मराठीचे भवितव्य उत्तम आहे. त्याबाबत चिंता नसावी.’ वा रे व्वा!
प्रत्यक्षात स्थिती काय आहे? मराठी शाळा बंद पडताहेत. ज्या चालू आहेत त्यांची मराठीकडून सेमी-इंग्रजीकडे आणि कालांतराने पूर्ण इंग्रजी माध्यमाकडे वाटचाल सुरू आहे. मराठी माध्यमाच्या महाविद्यालयांना प्रौढ मुलांच्या पाळणाघरांची किंवा शरणार्थीसाठी बनवलेल्या छावण्यांची अवकळा आली आहे. मराठीची बाजारपेठ आहे कुठे? खूप कष्ट करून पसे मिळवावेत, पण बाजारात खरेदी करायला गेल्यावर ते चालू नयेत अशी स्थिती मराठीच्या उच्च शिक्षणाची झाली आहे. अभिजन वर्गाने मराठीवर कधीच फुली मारली होती. आता बहुजन वर्गानेही त्याच मार्गाने जायचे ठरवले आहे. परिणामी, भाषावृद्धीसाठी अत्यावश्यक असलेली दोन पिढय़ांमधील भाषिक संक्रमणाची प्रक्रियाच बाधित व अवरुद्ध झाली आहे. मराठी भाषा ना व्यावहारिक संधी देऊ शकत, ना सामाजिक प्रतिष्ठा, मग ती शिकून करायचे काय, असा प्रश्न करिअरच्या मागे लागलेल्या युवा पिढीला पडला तर नवल नव्हे.
ज्यांना मराठीची स्थिती वाईट आहे हे मान्य आहे त्यांच्या मनातही नेमके काय केले म्हणजे ही स्थिती बदलेल याविषयी काही भ्रम आहेत. मराठीच्या ऱ्हासाला आपण सर्व जबाबदार आहोत आणि आपण सर्वानी मिळून ठरवले तर ही स्थिती बदलू शकतो असे अनेकांना वाटते. परंतु मराठीच्या दुरवस्थेला नेमके कोण, कशा प्रकारे व किती प्रमाणात जबाबदार आहेत याच्या खोलात आपण शिरत नाही. मराठीचा विकास ही सामूहिक जबाबदारी असेल तर व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर तिचे उत्तरदायित्व आपण कधी निश्चित केले आहे काय? मुळात भाषेचा ‘विकास’ म्हणजे काय? भाषाविकासाच्या कामात सरकारला काही भूमिका असते काय? रस्ते, पाणी, वीज यांचे नियोजन, नियंत्रण हे सरकारचे काम आहे हे आपणास पटते. पण सार्वजनिक भाषेची दुरवस्था झाली तर तो राजकीय मुद्दा होत नाही. उलट सामूहिक आत्मक्लेश करून घेतो. वास्तविक, भाषेबाबत लोकभावना लक्षात घेऊन तिच्या वापराबाबत धोरण ठरवणे, तिची वापरक्षेत्रे निश्चित करणे, सक्ती आणि संधी यांच्याद्वारा तिच्या वापराच्या प्रेरणा निर्माण करणे, तिचे नियोजन व नियमन करणे हे सरकारचे काम आहे. सरकारने स्वत: उद्योग करू नयेत हे खरे, पण लोकांनी उद्योग करावेत म्हणून जशा पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत तशाच भाषेच्या वाढीसाठी भाषिक यंत्रणा प्रस्थापित केल्या पाहिजेत आणि कोणी काय करायला पाहिजे हे निश्चित करायला हवे. भाषेचा विकास ही व्यक्तिगत किंवा स्वेच्छाधीन बाब असू शकत नाही, म्हणूनच सरकारनामक शिखर संस्थेला त्या कामी प्रमुख भूमिका पार पाडावी लागते हे जगात इतरत्र घडताना आपण पाहतो, परंतु आपले सरकार ती टाळते आहे. कारण लोकांनाही भाषानिवडीचे स्वातंत्र्य हवे आहे.
स्वभाषा हे अनेकांच्या बाबतीत आता मूल्यच राहिलेले नाही. जे लोक मराठीच्या प्रेमापोटी, निष्ठेपायी कर्तव्यभावनेने मराठीचा वापर करताहेत, इतरांकडेही आग्रह धरताहेत त्यांना संकुचित, प्रतिगामी, फुटीरतावादी ठरवले जात आहे. जे थोडे लोक मराठीबाबतच्या आपल्या निष्ठा वाटेल ती व्यावहारिक किंमत मोजून शाबूत ठेवून आहेत त्यांनाही पुढच्या काळात मराठीपासून दूर जावे लागेल. कारण अशा लोकांना मराठीच्या वापरासाठी समाजातून तर नाहीच, पण त्यांच्या घरातूनही पािठबा मिळणार नाही.
नग्न लोकांच्या वसाहतीत जेव्हा चार-दोनच लोक कपडे घालतात तेव्हा त्यांना वेडय़ात काढले जाते. अशा वेळी स्वत:चे वस्त्रहरण करून घेण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणता पर्याय आहे?
*लेखक लेखक मुंबईतील वझे-केळकर कॉलेज, मुलुंड येथे मराठी विभाग प्रमुख आहेत.
No comments:
Post a Comment