Friday 26 July 2019

पसायदान व मराठीतील अर्थ


पसायदान व मराठीतील अर्थ

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचें ॥ २ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

मराठी अर्थ

आता विश्वात्मक देवाने, या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान ( प्रसाद ) द्यावे. ॥ १ ॥
दुष्टांचे दुष्टपण नाहीसे होवो, त्यांचा सत्कर्मे करण्या मध्ये स्वायस्य वाढो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो. ॥ २ ॥
पापी माणसाचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो. प्राणमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. ॥ ३ ॥
सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणिमात्रांना भेटत जावोत. ॥ ४ ॥
जे (संत) कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत, चेतनारूपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत, अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत, ॥ ५ ॥
जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत, तापहीन सूर्यच आहेत असे संतसज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र होवोत. ॥ ६ ॥
तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी. ॥ ७ ॥हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे, त्यांनी या जगातील दृष्य आणि अदृष्य भोगांवर विजयी व्हावे. ॥८ ॥
यावर विश्वेश्वर गूरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले. ॥ ९ ॥

No comments:

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

  Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Frien...