Wednesday, 11 July 2018

जाणून घेऊया जागतिक लोकसंख्या दिनाविषयी...

जाणून घेऊया जागतिक लोकसंख्या दिनाविषयी...
11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलनेे 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जाणून घेऊया जागतिक लोकसंख्या दिनाविषयी...
वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी समाजातील भरपूर लोकांना एकत्रितपणे काम करायला लावून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे कार्यक्रम आखून आणि कृती आयोजित करून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. चर्चासत्रातील चर्चा, शैक्षणिक स्पर्धा, शैक्षणिक माहिती सत्रे, निबंधलेखन स्पर्धा, विविध विषयांवर सार्वजनिक स्पर्धा, पोस्टर वितरण, गाणी, क्रीडाविषयक कार्यक्रम, व्याख्याने आणि कविता, कलात्मक काम, घोषणा, मध्यवर्ती कल्पना आणि संदेश यांचे वितरण, कार्यशाळा, भाषणे, वादविवाद, गोलमेज चर्चा, पत्रकार परिषदा, विविध वृत्तवाहिन्या आणि इतर अनेक माध्यमांतून बातम्यांचे वितरण यांसारख्या अनेकविध कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश असतो. लोकसंख्यावाढीच्या समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकारच्या आरोग्य संघटना आणि लोकसंख्याविषयक विभाग एकत्रितपणे काम करतात. त्यासाठी परिषदा, संशोधन कार्ये, बैठका, प्रकल्प विश्‍लेषण इत्यादी अनेक कार्यक्रमांची आखणी केली जाते.
सन 2011 मध्ये जागतिक लोकसंख्या 7 अब्जांवर पोहोचली, तेव्हा वाढती लोकसंख्या हे विकासासमोरचे एक प्रचंड मोठे आव्हान असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ‘प्रजननविषयक आरोग्य सेवांची सार्वत्रिक उपलब्धता’ हा संदेश सन 2012 च्या ‘जागतिक लोकसंख्या दिना’च्या कार्यक्रमानिमित्त जगभर दिला गेला. त्यावेळी जागतिक लोकसंख्या ही सुमारे 7 अब्ज 2 कोटी 50 लाख 71 हजार 966 एवढी होती. समाजातील जास्तीत जास्त कुटुंबे छोटी आणि आरोग्यपूर्ण असावीत आणि लोकांना शाश्‍वत भवितव्य मिळावे, यासाठी मोठी पावले उचलली गेली. प्रजननविषयक आरोग्यासाठी आवश्यक त्या सुविधांचा मागणीनुसार पुरवठा व्हावा, या अनुषंगाने महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यात आली. प्रजननविषयक आरोग्यात वाढ करून आणि लोकसंख्यावाढीचा दर घटवून सामाजिक दारिद्य्र कमी करण्यासाठीही पाऊल आजमितीस उचलले गेले.
जगभरामध्ये गर्भवतींचे अनोराग्य आणि त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामागे प्रजननविषयक आरोग्याच्या समस्या हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे ‘संयुक्त राष्ट्रसंघाचा विकासविषयक कार्यक्रम (UNDP) त्याकडे आता विशेष लक्ष देत आहे. जागतिक स्तरावर प्रसूतीदरम्यान दररोज सुमारे 800 महिलांचा मृत्यू होतो. या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी लोकसंख्या दिनाची मोहीम ‘प्रजनन आरोग्य आणि कुटुंब नियोजन’ याविषयी जगभरातील लोकांची माहिती आणि कौशल्य वाढवण्याचे काम करते. जगभरात दरवर्षी सुमारे 1.8 अब्ज तरुण-तरुणी प्रजनन वयात प्रवेश करत असतात. त्यामुळे प्रजनन आरोग्याच्या प्राथमिक बाबींकडे त्यांचे लक्ष वेधणे अनिवार्य आहे, त्यातही 15 ते 19 वयोगटातील किशोरवयीनांच्या लैंगिकतेशी संबंधित समस्या सोडविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण आकडेवारीनुसार, या वयोगटांतील सुमारे दीड कोटी महिला माता बनतात आणि सुमारे 40 लाख महिला गर्भपात करवून घेतात.

No comments:

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

  Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Frien...