Monday, 19 August 2019

*विद्यार्थ्यांना शिस्त का लागत नाही?*

*विद्यार्थ्यांना शिस्त का लागत नाही?*

*उत्तर*===

मुलांच्या भविष्यासाठी हा पूर्ण लेख वाचण्यासाठी दहा मिनिट काढावे.

विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. काळानुसार या भूमिका बदलत जातात. भूमिका जशा शिक्षकांच्या बदलत जातात तशा पालकांच्या सुद्धा. *ब-याच वेळा शिक्षक- पालक यांच्या नात्यावर विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते.*

५० वर्षांपूर्वी गुरुजी विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायचे. विद्यार्थ्यांना झोडपले, मारले तरी पालक शिक्षकांना काही बोलायचे नाहीत उलट विद्यार्थी आई - वडिलांना सांगायचे नाही की आज शाळेत मला शिक्षा झाली किंवा मला मारले कारण वडिलांचा अजून मार बसायचा. तुला शिक्षा झाली म्हणजे तू चुकलाच असेल ही धारणा पक्की होती. याचा परिणाम असा झाला होता की शिक्षकांबद्दल भीतीयुक्त आदर होता. *शिक्षक हेच सुधारण्याचे प्रवेशद्वार यावर पालकांची श्रद्धा होती.* त्या काळात शिक्षक ही तसेच होते . *अशा शिक्षकांमुळे आपण सारे घडलो.* आयुष्यात येणाऱ्या समस्या या आपल्यालाच म्हणजे स्वतःला सोडवायच्या असतात. आपले आई-वडील शाळेत येऊन शिक्षकांशी बोलणार नाही, समस्या सोडवणार नाही. . यामुळे नियमबाह्य कामच करू नका. . *चुकीचे गैरवर्तन करू नका. हे शिक्षकांच्या धाकामुळे शक्य झाले* जे पुढे आयुष्यात नोकरी-व्यवसाय करताना खूप उपयोगी पडले.
*शाळेतील नियम पाळल्यामुळे ऑफिसमध्ये वेळेवर जाण्याची सवय लागली.*

*आजकालचे पालक विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाक खुपसून शिक्षकांशी चर्चा (वाद) करायला येतात* आणि ही चर्चा चालते त्या मुलांदेखत. जिथे मुलांच्या मनाला समजते की आई-वडील हे आपल्या प्रत्येक समस्या सोडवतील (समस्या या समस्या नसून बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे गैरवर्तन असते पण ते त्याला कधीच मान्य नसते.) *आई-वडील आपल्या वर्तणुकीला सपोर्ट करता बघून त्यांचे सुधारण्याचे मार्ग हळूहळू कमी होत जातात.* हे त्या मुलाला समजत नसते किंबहुना हे समजण्याचे वयच नसते पण पालकांना समजत असते. मात्र आंधळया प्रेमापोटी ते समजण्याच्या मनस्थितीत नसतात.

50 वर्षांपूर्वीचे शिक्षक हे खरे गुरुजी होते. त्यानंतर गुरुजी हळूहळू कमी होत त्यांच्यातले उरलें कडक शिक्षक. .
*या कडक शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचा परिणाम अतिसंवेदनशील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होऊ लागला.*
1990 नंतरच्या म्हणजेच पंचवीस तीस वर्षांपूर्वीचे शिक्षक होते त्यांच्याकडून अति कडक शिस्त आणि शिक्षा यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान काही प्रमाणात सुरू झाले.
याच दरम्यान ग्लोबलायझेशन नुकतेच आले होते. पालकांची मानसिकता बदलत होती.. *भौतिकवादाकडे आपण चालायला सुरुवात झाली आणि अतिमहत्त्वकांक्षा, हव्यास अशी चुकीची मूल्ये समाजात रुजायला लागली.*
पास-नापास यांचा गंभीर प्रश्न समाजासमोर यायला लागला. नैराश्यातून दहावीच्या विद्यार्थ्यांचे आत्महत्या प्रमाण वाढले. *"शालेय परीक्षेत नापास म्हणजे आयुष्यात नापास", या एका विचारामुळे विद्यार्थ्यांंमध्ये नैराश्य वाढत गेले.*

याच दरम्यान शिक्षणाचा कायदा आला. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा करणे हा गुन्हा ठरवला. आठवीपर्यंत नापास करता येणार नाही अशा तरतुदी आल्या यामुळे कडक शिक्षकांच्या मानसिकतेमध्ये हळूहळू बदल झाला. बरेच शिक्षक रिटायरमेंट स्टेजलाच होते. 2001 नंतर शिक्षकांची नवी तरुण पिढी यायला लागली. पण या दरम्यान पालकांच्या मानसिकतेमध्ये फार बदल झाला होता. येत्या दहा वर्षांमध्ये भौतिकवाद समाजात प्रचंड रुजला. *जिंकणे हेच सर्वस्व मग भले ते कुठल्याही मार्गाने मिळो हा संस्कार पालकांमध्ये घट्ट रुजला आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर झाला.* पालकांमध्ये आपल्या मुलाबद्दल अति महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या. एकुलते एक बाळ. . त्याला हव्या त्या गोष्टी पुरवणे. . त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणे.. हे पालकांचे आद्य कर्तव्य झाले. याच दरम्यान पालक आणि विद्यार्थी सोशल मीडिया, मोबाईल, टीव्ही या सर्व गोष्टीत अडकले. *मैदानी खेळ नाही, अति स्क्रीन टाइम यातून मुलं हट्टी बनत गेली. मागितले तर मिळते हा संस्कार अधिक रुजला.* *चंगळवादामुळे पालकांमध्ये मूल्य-संस्कार याचे महत्व कमी झाले. याचा महत्त्वाचा परिणाम शिक्षकांबद्दलचा सन्मान कमी झाला.* प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेतली जाते अशा खोट्या समजुतीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान व्हायला सुरुवात झाली. *अति लाडा मुळे म्हणा किंवा अतिमहत्त्वाकांक्षी पणामुळे म्हणा किंवा शिक्षण कायद्याचा गैरवापर म्हणा पालक छोट्या-छोट्या कारणांसाठी शिक्षकांशी वाद घालू लागले.*

आईने मुलाच्या संपूर्ण अभ्यासाची जबाबदारी स्वीकारली. १०० पैकी १०० मार्कांसाठी मुलांच्या अभ्यासाच्या चुकांपासून शिक्षकांच्या चुका काढण्यापर्यंत सर्व ती करू लागली. *पालकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर फक्त शिक्षक कसे चुकीचे होते आणि माझी मुलगी/ मुलगा कसा योग्य आहे आणि तो/ती कधीच खोटे बोलत नाही यावरच चर्चा रंगू लागल्या.* *येत्या १० वर्षातील शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल करणे कठीण होऊ लागले. ADHD, Learning Disabilities, Lack of Concentration यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढले.* वर्गातील दोन-तीन टग्या मुलांमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब होऊ लागला. त्यात हायपरऍक्‍टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच होत्या. *त्या हाताळायच्या कशा हा शिक्षकांसमोर प्रश्न पडला.*

शिक्षण कायद्याच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांना मारणे सोडा साधे रागावणे कठीण होऊन बसले. *शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यावी तर काय द्यावी हा प्रश्न पडला. वर्गाच्या बाहेर काढले तर पालक भांडायला येतात की तो/ती वर्गाच्या बाहेर राहिल्याने तिचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्गात उभे केले तर पालक ओरडतात की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला, आता तो शाळेत यायला नाही म्हणतो.
कान पकडून उठाबशा काढायला सांगितले तर पालक दुसऱ्या दिवशी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतात.
खूप त्रास देतो म्हणून कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून काढून टाकले तर लगेच पालक म्हणतात आम्ही फी भरली आहे त्याला ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या.* तशी स्कूल डायरी मध्ये नोट्स येते. टीचरने त्याच्याशी बोलणे सोडले तर पालक लगेच म्हणतात पाहू टीचर किती दिवस बोलत नाही तुझ्याशी. . तू स्वतःहून बोलू नकोस. . प्रिन्सिपल ला सांगून तिला तुझ्याशी बोलायला मी भागच पाडते.. अशी कशी टीचर बोलत नाही पाहू.

*म्हणजे मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यायचीच नाही पण शिस्तीची अपेक्षा शाळेकडून नेहमी ठेवायची.* विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याबरोबर कर्तव्य सुद्धा पूर्ण करायचे असतात, जबाबदारीसुद्धा पाळायची असते याचा संस्कारच आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजत नाही. *शिक्षक हे सुधारण्याचे प्रवेशद्वार असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेम आणि स्वातंत्र्य देऊन त्यांची मनं जिंकायची असतात पण हे करण्याच्या प्रक्रियेमध्ये शिस्त लावण्यासाठी काही अधिकार शिक्षकांना सुद्धा लागतात.* *मारणे, जबर शिक्षा करणे हे अघोरीच आहे ते केव्हाच कालबाह्य झाले आहे आणि आजकालचे शिक्षक याचे समर्थनपण करणार नाहीत पण सध्याच्या काळात साधे रागावणे, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी छोट्या-छोट्या शिक्षा करणे सुद्धा पालकांच्या दबावापोटी बंद झाले आहे. याचा विद्यार्थ्यांवर दूरगामी खूप वाईट परिणाम होतो.* विद्यार्थ्यांना अपमान पचवण्याचे मानसिक धैर्य राहत नाही. असे विद्यार्थी तरुणपणी लवकरच नैराश्याच्या विहिरीत पडतात. मला कोणी रागवत असेल तर ते माझ्या फायद्यासाठी आहे. . कुणीही शिक्षक आनंदासाठी, काट काढण्यासाठी, दुसऱ्याचा राग विद्यार्थ्यांवर काढण्यासाठी विद्यार्थ्याला रागवत नसतात. ते रागवतात याचा सरळ अर्थ विद्यार्थी कुठेतरी चुकतो आहे पण विद्यार्थ्यांची धारणा होऊन जाते की मला कोणीही रागवू नये ओरडू नये. या धारणेने विद्यार्थी मोठा होतो आणि मग पुढे आयुष्यात वावरताना नोकरी करताना व्यवसायामध्ये, समाजात लोकांशी वागतांना जड जाते. कारण जग आपल्या म्हणण्यानुसार नाही चालत. *आयुष्यात मान-अपमान हे दोन्ही येत राहते. मारणं हे अयोग्यच त्याला मी काय कोणीही समर्थन करणार नाही पण वर्गात रागावणं सुद्धा आजकाल बंद झाले आहे त्यामुळे अपमान कसा सहन करावा आणि त्यातून self analysis कसे करावे ही प्रक्रियाच मुलांच्या मनांत होत नाही. जी सर्वंगीण विकासासाठी आवश्यक आहे.*

काही झाले की पालक शिक्षकांशी चर्चा करायला येतात ज्यामध्ये चर्चेचा सूर कमी आणि कोर्टात जसे आरोपीला प्रश्न विचारतात तसेच पालक शिक्षकांना विचारतात. या सर्व संवादामुळे मुलांच्या मनात शिक्षकांविषयीचा आदर निघून जातो आणि विद्यार्थी हेच शिकतो की मला काही अडचण आली तर आहे माझी आई. त्याच्या प्रत्येक (चुकीच्या) निर्णयांमध्ये आई सहभागी होते. ती स्वतः निर्णय घेते. . *ती इतकी involve होते की त्याचा अपूर्ण राहिलेला होमवर्क, प्रोजेक्ट, अभ्यास ती स्वतः पूर्ण करते. पाल्य दुसऱ्यांवर अवलंबून राहायला शिकतो.* स्वावलंबनाचे धडे लहानपणी द्यायचे असतात ते ती विसरून जाते. *ही मुलं मोठी झाली आणि घरात आग लागली तरी फायर ब्रिगेडला फोन करायचा असतो हे सुद्धा त्यांना लवकर सुचत नाही एवढे ठोम्बे बनतात कारण लहानपणापासून मुलांसाठी आपण Ready made answer देत होतो.*

जिथे पालक शिक्षकांशी उद्धटपणे वागतात तिथे विद्यार्थ्यांची प्रगती खुंटते. मानसशास्त्राचा नियम आहे. . *जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर असतो, श्रद्धा असते तेव्हा शिक्षक जेव्हा वर्गात शिकवतात तेव्हा अंतर्मनाची द्वारे आपोआप उघडली जातात* आणि शिक्षक जे शिकवतात ते लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा पालक विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या वर्ग शिक्षकांशी उद्धटपणे बोलतात किंवा सातत्याने भेटून तक्रारीचा पाढाच गात राहतात तिथे पाल्याच्या मनातील शिक्षकांबद्दलचा आदर कमी होत जातो आणि त्याचे शैक्षणिक समस्याचे प्रमाण वाढत जाते.

काही पालक खास करून आया आपल्या बद्दल नेहमी असमाधानी असतात. *पालकत्वाची A B C D सुद्धा माहित नसलेल्या या आया शिक्षकांसमोर माझं मूल कसं मूर्ख आहे, त्याला कसं कळत नाही आणि या सर्वाला एकमेव टिचरस कसे जबाबदार आहे हे मोठ मोठ्या आवाजात दहा पालकांसमोर बडबडत असतात.* अशा पालकांच्या पाल्याचे भविष्याबद्दल खरच चिंता वाटते कारण असे पालक समजून घेण्याच्या पलीकडचे असतात. काही पालक तर मुख्याध्यापकांकडे हट्ट धरतात की शिक्षकांना बोलवा आणि माफी मागायला लावा. यातून टीचेर्सचे मनोधैर्य कमी होते. ते शाळेतील एक्स्ट्रा कामे करायला कंटाळा करतात. *शिक्षकांकडून उत्तम कामाची अपेक्षा असेल तर त्याचे कौतुक होणेही गरजेचे असते* खास करून ज्या शाळा फक्त अभ्यास शिकवण्याचे कार्य करत नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची धडपड करत असतात आणि त्यासाठी सातत्याने नवनवीन अॅक्टिविटीचे आयोजन करत असतात. अशा ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मुख्याध्यापकांना उत्तम नियोजनाबरोबर शिक्षकांचे सहकार्य अपेक्षित असते. हे सहकार्य हळूहळू कमी होते.

या काही कुरकुरे पालकांमुळे शिक्षकांचा उत्साह कमी होतो. प्रत्येक शाळेत असे कुरकुरे पालक असतात त्याचे प्रमाण दहा टक्के पण नसते पण त्यांच्या चुकीच्या संवादामुळे, चुकीच्या पालकत्वामुळे, चुकीच्या अपेक्षेमुळे शाळा व्यवस्थापनाशी वाद होतात. 90% पालक हे शाळेबद्दल नेहमी आनंदी असतात पण ते बघ्याची भूमिका घेतात. शिक्षकांना कौतुक करण्यात ते कंजुषी करतात आणि मग हे 10% पालक अतिशय उद्धटपणे विषय हाताळतात. सोशल मीडिया, वृत्तपत्र यांना चुकीच्या माहिती देऊन बातम्या प्रसिद्ध करतात. व्यक्ती/संस्था जेवढी मोठी तेवढ्या तिखट-मीठ लावून बातम्या रंगवल्या जातात.. या सर्वांची सुरुवात झालेली असते ती म्हणजे अतिमहत्त्वाकांक्षा अति अपेक्षा चुकीच्या पालकत्वाच्या या बीजातून.

कालच बातमी वाचली नाशिकमध्ये एक पाचवीचा विद्यार्थी दोन दिवस शाळेत आला नाही म्हणून शिक्षकाने आईला फोन करून सांगितले. आई म्हणे तो रोज शाळेत जातोय. आईने मुलाला विचारले, तेव्हा तो कबूल झाला मी शाळेत जातो सांगून घरातून निघतो पण शाळेत जातचं नाही. तो वाईट मुलांच्या संगतीत लागला होता. म्हणून आईने त्याला दोन फटके दिले. आईने मारले याचा राग आला म्हणून त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आता या घटनेला कोण जबाबदार? शिक्षक.. ज्याने काळजीपोटी मुलगा शाळेत येत नाही म्हणून फोन केला का आईने त्याला पहिल्यांदाच मारले का तो स्वतः विद्यार्थी ज्याला राग सहन होत नव्हता. आईने आधीपासूनच शिस्तीला महत्त्व दिले असते, चुकले की रागवले असते, *शाळेचे नियम हे भविष्य चांगले करण्यासाठीच असतात* हे जर पहिलीपासून मनावर बिंबवले असते तर आज ही वेळ कदाचित आली नसती.

*पालकांनो शिस्त ही प्रेमाची पहिली पायरी आहे.* शिक्षकांना त्यांची कामे करू द्या. *शाळेचे छोटे छोटे नियम पाळावेच लागतात कारण त्यातून मोठेपणी भारतातील कायदे पाळण्याचे संस्कार रुजत असतात.* शाळेत थोड्या उशिरा पोहोचल्याने त्यांच्यामध्ये वेळेचे व्यवस्थापनाचे महत्व कमी होते याचे साधे ज्ञानसुद्धा आजकाल पालकांना नसते. आजकालची मुलं अति लाडा पोटी बिघडत चालली आहे त्यांना कोणाचीच भीती उरली नाही. त्यांची वाढ अशीच झाली तर पुढे ते आई-वडिलांची झोप उडवू शकतात म्हणून शाळा शिक्षक आणि पालक यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरण असणे गरजेचे आहे. शाळेत होणाऱ्या ओपन हाऊस, पालकांच्या मिटींगला शिक्षकांशी सन्मानांनी बोलणे, त्यांना समजून घेणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. एकमेकांना आदर आणि सन्मान जर राहिला तर त्या विद्यार्थ्यांना योग्य रुळावर आणणे सोपे जाईल.

*जिथे शिक्षकांचा सन्मान होत नाही तिथे समाजाची प्रगती खुंटते आणि देशाचे नुकसान होते.*

No comments:

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

  Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Frien...